नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित

जुनाट बुरसटलेल्या पायवाटा सोडून अशी बंडखोर अशिक्षित स्त्री ही स्त्री-मुक्तीच्या नव्या वाटा कशा शोधत असेल? स्वतःच्याच घरात निर्वासितांसारखं जीवन जगूनही अन् आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत उपेक्षेची जन्मठेप भोगूनसुद्धा शापितासारखं जीवन व्यतीत करणारी स्त्री खंबीरपणे कशी लढली असेल? तिच्या याच बंडाची अन् संघर्षाची गोष्ट कादंबरीत मांडण्याचा मी पोटतिडकीनं प्रयत्न केलाय.......